वैजापूर तालुक्यातील भगूर परिसरात शोककळा
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील रांजनगाव नरहरी शिवारातील गट क्रमांक २०४ येथील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, महालगाव येथील दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. ११) दुपारी घडली.
दोघेही वैजापूर तालुक्यातील भगूर येथील रहिवासी आणि महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिक्षण घेत होते. मयुर किशोर मोईन (वय १५) आणि साहिल संतोष झाल्टे (वय १६, दोघेही थोरवाघलगाव, ता. वैजापूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीत शिकत होते. शाळा सुटल्यानंतर ते दोघे मित्र पोहण्यासाठी खदानीकडे गेले.
दुपारी सुमारे १ वाजता तेथे पोहोचले, मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. पालक आणि ग्रामस्थांनी शोध घेतल्यावर खदानीच्या काठावर त्यांचे कपडे, बॅग व चपला सापडल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे इन्चार्ज लक्ष्मण कोल्हे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवघ्या १५ मिनिटांत दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
खदानी भोवती सुरक्षा उपाययोजना करा :
या दुर्दैवी घटनेमुळे थोखाघलगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संबंधित खदानीभोवती सुरक्षा उपाययोजना राबवून प्रतिबंधक फलक लावण्याची मागणी केली आहे.
खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही खोल पाण्यात गेले.
शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर दोघे मित्र आता थोडं मजा करूया या उत्साहात नरहरी रांजनगाव शिवारातील गट क्रमांक २०४ मधील खदानीत पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही खोल पाण्यात गेले आणि क्षणात लाटांमध्ये अदृश्य झाले. काही वेळानंतर खदानीच्या काठावर शाळेची दप्तरं, कपडे आणि ओळखपत्रं सापडल्याने ग्रामस्थांना संशय आला.
चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, बीट अंमलदार बिघोत, बाबा शेख, पोलिस पाटील कडू म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास शिल्लेगाव पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने करत आहेत. या कारवाईदरम्यान गंगाधर म्हस्के, कचरू नाईक, अविनाश गलांडे, अमोल मलिक, मधुकर वालतुरे व गौतम अल्हाड यांनी मोलाचे सहकार्य केले.